Editorial Section
भारतामध्ये सर्वप्रथम ज्युदोचा प्रारंभ झाला तो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1929 च्या सुमारास. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या आमंत्रणावरून जपानी सेन्से (सेन्से म्हणजे शिक्षक) श्री. ताकागाकी शांतिनिकेतन येथे आले आणि त्यांनी ज्युदोचे प्रात्यक्षिके सादर केली. परंतु त्यानंतर ज्युदो प्रशिक्षणातील सातत्याच्या अभावामुळे प्रसार तिथेच थांबला. परंतु या प्रात्यक्षिकांमुळे ज्युदोच्या भारतामधील प्रवेशाची इतिहासामधे नोंद झाली. त्यानंतर जागतिकस्तरावर ज्युदोचे माहेरघर असणार्या ‘कोदोकान’ विद्यापीठातील समजलेल्या नोंदीप्रमाणे 1932 साली अमरावतीच्या श्री. ज्ञानेश्वर देशपांडे यांना शो दान ब्लॅक बेल्ट प्रदान केला गेला. वर्ष 1901 ते 1910 दरम्यान 14 भारतीयांनी प्रशिक्षण घेतले आणि ग्रेडेशनमध्ये सहभाग घेतल्याचीही नोंद असल्याचे कळते. मात्र भारतीय ज्युदोचा सर्वार्थाने प्रचार – प्रसार झाला तो वर्ष 1940 नंतरच्या काळामध्येच आणि याचे मुख्य स्त्रोत होते ‘महाराष्ट्र आणि मराठी माणूस’.