History of Maharashtra Judo
भारतामध्ये ज्युदोचा प्रसार
भारतामध्ये सर्वप्रथम ज्युदोचा प्रारंभ झाला तो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1929 च्या सुमारास. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या आमंत्रणावरून जपानी सेन्से (सेन्से म्हणजे शिक्षक) श्री ताकागाकी शांतिनिकेतन येथे आले आणि त्यांनी ज्युदोचे प्रात्यक्षिके सादर केली. परंतु त्यानंतर ज्युदो प्रशिक्षणातील सातत्याच्या अभावामुळे प्रसार तिथेच थांबला. परंतु या प्रात्यक्षिकांमुळे ज्युदोच्या भारतामधील प्रवेशाची इतिहासामधे नोंद झाली. त्यानंतर जागतिकस्तरावर ज्युदोचे माहेरघर असणार्या ‘कोदोकान’ विद्यापीठातील समजलेल्या नोंदीप्रमाणे 1932 साली अमरावतीच्या श्री ज्ञानेश्वर देशपांडे यांना शो दान ब्लॅक बेल्ट प्रदान केला गेला. वर्ष 1901 ते 1910 दरम्यान 14 भारतीयांनी प्रशिक्षण घेतले आणि ग्रेडेशनमध्ये सहभाग घेतल्याचीही नोंद असल्याचे कळते. मात्र भारतीय ज्युदोचा सर्वार्थाने प्रचार – प्रसार झाला तो वर्ष 1940 नंतरच्या काळामध्येच आणि याचे मुख्य स्त्रोत होते ‘महाराष्ट्र आणि मराठी माणूस’.
श्री रघुनाथ दामोदर खाणीवाले सेन्से ( 1909-1980)
ज्युदोचे उदगाते सेन्से डॉ. जिगोरो कानो आणि सेन्से प्रोफेसर मिफुने
यांच्याकडून खाणीवाले सेन्से (ब्लॅक बेल्ट 7 दान) यांनी जपान मध्ये जाऊन ज्युदोचे धडे
गिरवले. साधारणपणे 1930 चा तो काळ होता आणि लाठी-काठी आणि कुस्ती याचे ज्ञान असणार्या
तसेच उत्तम तिरंदाज असणार्या श्री खाणीवाले सेन्से यांना अमरावती येथील हनुमान व्यायाम
प्रसारक मंडळ या संस्थेमधून जपान येथे तिरंदाजीचे प्रशिक्षण देण्यासाठी पाठवले होते.
यासाठी त्यांना इचलकरंजी येथील महाराजांकडून शिष्यवृत्ती मिळाली होती. या आधी श्री
ज्ञानेश्वर देशपांडे यांना जपानमध्ये तिरंदाजीचे प्रशिक्षण देण्यासाठी या
शिष्यवृत्तीच्या आधारे पाठवण्यात आले होते पण ते कार्य काही कारणामुळे अपूर्ण राहिले.
त्यानंतर श्री खाणीवाले सेन्से यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी होकार दिल्याने
त्यांना जपान येथे पाठवण्यात आले. जपानमधील चार वर्षांच्या काळामध्ये श्री खाणीवाले
सेन्से यांनी तिरंदाजीचे तंत्र शिकवत असतानाच त्यांनी ज्युदोचे प्रशिक्षण प्राप्त केले.
भारतामध्ये परतल्यानंतर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे तेथील पहिलवानांना
शिकवण्यासाठी काही काळ ज्युदोचे वर्ग सुरू केले आणि नंतर ते इचलकरंजी येथून पुण्याला
आले व पुण्यात स्थाईक होवून वर्ष 1940 च्या सुमारास त्यांनी ज्युदो प्रसारास प्रारंभ
केला.
1935 च्या काळामद्धे श्री खाणीवाले सेन्से बर्लिन (जर्मनी) येथे आयोजिलेल्या
ऑलिंपिक्समध्ये सहभागी झालेल्या भारतीय चमूचे व्यवस्थापक होते. त्यांच्या परिश्रमामुळे
पुण्यातील ज्युदोचा प्रसार अत्यंत प्रभावशाली झाला व त्यांचे विद्यार्थी मोठ्या
संख्येनी निर्माण झाले. या विद्यार्थ्यानी ज्युदो प्रसाराची कास धरून महाराष्ट्रामध्ये
सर्वदूर प्रचारास सुरुवात केली. पुण्यानंतर नासिक, कोल्हापूर, अमरावती, सातारा अशा
जिल्ह्यामध्ये ज्युदो चांगल्या पद्धतीने विस्तारत गेला तर त्यानंतर ठाणे, औरंगाबाद,
नागपूर आदी जिल्ह्यामध्ये सेन्से श्री खाणीवाले यांच्या हयातीमध्ये महाराष्ट्रात ज्युदो
खेळला जावू लागला. सेन्से खाणीवाले यांच्या पहिल्या फळीतील विद्यार्थी सर्वश्री दीपक
टिळक, सारंग साठे, बाळ देवकर, शरद जोशी, प्रदीप मोहिते, विजय लिमये, रामचंद्र जोशी,
श्रीनिवास कुलकर्णी, सुभाष जोशी, रत्नाकर पटवर्धन, धनंजय भोंसले, पुरषोत्तम चौधरी,
राजकुमार पुनकर, ज्ञानेश्वर आग्ने यासह अनेकांनी या खेळाच्या प्रसाराची धुरा वाहिली.
महाराष्ट्रात प्रसार होतानाच मुंबई येथेही ज्युदोचे प्रसार प्रचाराचे
कार्य सुरू झाले होते. श्री नारायण टी. बंगेरा (5 दान), जे की ‘अकीदो’ या जपानी मार्शल
आर्ट्सचे खेळाडू असल्याने त्यांना ज्युदोचेही प्रचंड वेड होते. त्यांनी प्रोफेसर टी.
एम. सुवर्णा यांच्याकडून ‘ज्युज्युत्सु’ शिकलेले असल्याने श्री बंगेरा यांनी ज्युदो
शिकून त्यावर प्रभुत्व मिळवले. वर्ष 1960 मध्ये मुंबई ज्युदो संघटनेची स्थापना करण्यात
त्यांनी पुढाकार घेतला आणि सातत्य राखत त्यांनी प्रसाराचे कार्य सुरू ठेवले. श्री
बंगेरा यांच्याबरोबर ज्युदो प्रसारास मुंबईमधे सर्वश्री एल. के. डागा, मोएज महम्मदली,
के. एन. पस्ताकिया, के. डी. डॉक्टर, डॉ. बरोडावाला, अरशीष वाडिया, परवेज मिस्त्री
आदींनी मोलाचे अंशदान दिले.
महाराष्ट्रात ज्युदो वाढत असताना वर्ष 1968 साली, ‘महाराष्ट्र ज्युदो संघटना’ संस्थेची
स्थापना करण्यात आली. खेळाच्या वाढत्या व्याप्तीचे स्वरूप लक्षात घेता मुंबई आणि
उर्वरित महाराष्ट्र अशा भौगोलिक आधारावर महाराष्ट्र - ‘ए’ म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्र
– ‘बी’ म्हणजे महाराष्ट्र राज्यातील मुंबई वगळता इतर सर्व जिल्हे अशी रचना करण्यात आली.
महाराष्ट्रातीलच पण हैदराबाद येथे असणारे डॉ. एस. ए. पिसोळकर यांनी आंध्र प्रदेश ज्युदो
संघटनेची स्थापना केली तर सर्वश्री डागा, महम्मदली, दीपक टिळक, बाळ देवकर या सर्वांनी
1965 साली पुढाकार घेत ज्युदो फेडरेशनच्या स्थापनेची गुढी रोवली.
श्री एल. के. डागा आणि त्यांच्या बरोबर काम करणार्या इतरांनी फेडरेशनाची स्थापना
केल्यानंतर इतर राज्यात ज्युदोचा प्रसार करतानाच आय.जे.एफ. तसेच आय.ओ.ए. आणि भारत
सरकारच्या क्रीडा मंत्रालयाशी सातत्याने संपर्क साधत ज्युदोला ओळख, संलग्नत्व आणि
प्रतिष्ठा मिळवून दिली, पर्यायाने सरकार दरबारी आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय
ज्युदोला अधिकृत क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळाली.
नंतरच्या काळात म्हणजे साधारणपणे 1970 च्या दशकात महाराष्ट्रातील ज्युदोला आणखी
प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू होते. जपानच्या कोदोकान विद्यापीठात
ज्युदोच्या उच्च प्रशिक्षणासाठी राज्यातील अनेक खेळाडू पाठवले गेले आणि तेथील तंत्र
शिकून घेत या खेळाडूंनी तेथील ब्लॅक बेल्ट प्राप्त केला. हे खेळाडू पुढे राज्यातील
ज्युदोच्या प्रचार – प्रसार कार्यात सहभागी झाले. साधारणपणे 1970 च्या दशकामध्ये
जपानहून घेतलेल्या प्रशिक्षणामुळे तज्ञ झालेल्या खेळाडूंनी राज्यात अनेक ठिकाणी शिबिरे
आयोजित करून तेथील ज्युदो प्रसारास गती मिळवून दिली. 1970 नंतर महाराष्ट्रात ज्युदोच्या
स्पर्धा घेणे नियमितपणे सुरू झाले. या स्पर्धा आयोजनामुळे जिल्हा व राज्य पातळीवर
खेळाडू तयार झाले आणि त्यांनी राष्ट्रीय स्तरावर राज्याचा दबदबा निर्माण केला.
राज्यातील ज्या खेळाडूंना जपानला जाता येत नव्हते त्यांच्यासाठी श्री एल. के. डागा
यांनी मुंबई येथे 1980 च्या दशकामध्ये कोदोकान येथील प्रतींनिधींना आमंत्रित करून
कोदोकान विद्यापीठातर्फे ज्युदोचे शिबीर आयोजित करून भारतातील खेळाडूंना संधी प्राप्त
करून दिली तर पुण्यामध्ये जपानी प्रशिक्षकांना आमंत्रित करून राज्यातील अनेक खेळाडूंना
या तज्ञ प्रशिक्षणाचा लाभ करून देण्यात आला.
पहिल्या फळीतील या कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे वाढलेल्या ज्युदोच्या कार्यक्षेत्रात भर
टाकली ती त्यानंतरच्या खेळाडू आणि कार्यकर्त्यांनी. यामध्ये सर्वश्री नितिन कानिटकर,
राजीव देव, अरविन्द वर्तक, संजय गव्हाणे, अविनाश जोशी, भास्कर पटवर्धन, आनंद अभ्यंकर,
शैलेश टिळक, अण्णासाहेब पाटोळे, प्रमोद संवत्सर, सुरेश कपाडिया, रविंद्र मेतकर, शरद
पवार, किशोर अहिरराव, शुभदा वैद्य, दत्ता आफळे, विकास पाटील, हे आणि इतर बरेच खेळाडू
होते. राज्याचे यशस्वी आणि गुणी खेळाडू सर्वश्री डॉ. सतीश पहाडे, विजय धीमान, विजय
पाटील, सतीश बागल, नारायण गायधनी, अर्चना केवाळे या प्रशिक्षकांनी पतियाळा येथील
एन.आय.एस. प्रशिक्षण नैपुण्य मिळवत पूर्ण केले. पहिल्या पिढीतील श्री राजकुमार पुनकर
आणि पुरषोत्तम चौधरी हे राज्यातील पहिले एनआयएस प्रशिक्षक आहेत. मुंबई येथील सर्वश्री
रविंद्र पाटील, मनोहर बंगेरा, सुरेश समेळ, कावस बिलिमोरिया, यतीश बंगेरा या व इतर
खेळाडूंनी मुंबई मध्ये ज्युदो क्लब सुरू करून खेळाडू घडवले आणि उत्तम प्रशिक्षकाची
भूमिका पार पाडली.
महाराष्ट्रातील खेळ खुल्या राष्ट्रीय आणि राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये बहरत
असताना राज्याच्या खेळाडूंची वर्णी भारताच्या संघात लागत गेली. जेष्ठ ऑलिंपियन श्री
कावस बिलिमोरिया यांच्या सातत्यपूर्ण खेळातील यशामुळे भारत सरकारांनी त्यांना अर्जुन
पुरस्काराने सन्मानित केले.
महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा ‘शिव छत्रपती पुरस्कार’ आजपर्यंत अनेक
ज्युदोपटूनी पटकावला आहे. ज्युदो खेळामधील पहिलं शिव छत्रपती पुरस्कार 1979 साली आदरणीय
खाणीवाले सेन्से यांना ‘संघटक’ म्हणून देण्यात आला. खेळाडूंसाठी असणारा प्रथम पुरस्कार
पुण्याच्या श्री नितिन कानिटकर व मंगला भुवड यांना प्राप्त झाला आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सर्वप्रथम भारतीय ज्युदो महासंघातर्फे श्री रवी पाटील यांची
भारताचे राष्ट्रीय ज्युदो प्रशिक्षकपदी नेमणूक केली गेली होती. त्यानंतर सर्वश्री शैलेश
टिळक, सुरेश समेळ, मनोहर बंगेरा, दत्ता आफळे, योगेश धाडवे, विजय धीमान यांची काही
विशिष्ट स्पर्धांसाठी तर डॉ. सतीश पहाडे यांची भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून अनेक
स्पर्धांसाठी नेमणूक झाली.
आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील सर्वश्री के एन पस्ताकीया, रवी पाटील,
मनोहर बंगेरा, कावस बिलिमोरिया, यतीश बंगेरा, शैलेश टिळक, तिलक थापा, मिनू बिश्त, शैलेश
देशपांडे, सुरेश कनोजिया, दत्ता आफळे यांनी यश मिळवले.
श्री एल. के. डागा यांनी ज्युदो युनियन ऑफ एशियाचे जनरल सेक्रेटरीपद भूषविले आहे तर
वर्ष 2005 पासून श्री मनोहर बंगेरा यांची ज्युदो युनियन ऑफ एशियातर्फे रेफरिंग कमिशनचे
ज्यूरी म्हणून नेमणूक झाली आहे.
राज्यातील प्रशिक्षक प्रशिक्षण-कार्य आणि पंचाची भूमिका योग्य रीतीने पार पाडत असतानाच
खेळाडूंनीही राज्याची मान उंच ठेवली आहे. वर्ष 1986 मध्ये भारतीय ज्युदोला
आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झाली आणि आणि त्यामुळे भारतीय खेळाडू प्रतिष्ठेच्या
आंतरराष्ट्रीय स्पर्धांना हजेरी लावू लागले. 1986 च्या सेऊल (दक्षिण कोरिया) येथील
एशियन गेम्समध्ये भारतीय संघांनी चार कांस्य पदके मिळविली आणि आणतरराष्ट्रीय
स्पर्धांमध्ये मुहुर्तमेढ रोवली. महाराष्ट्राचे श्री रवी पाटील हे प्रशिक्षक म्हणून तर
कावस बिलिमोरिया, राजेंद्र गांधी आणि नितीन राक्षे हे खेळाडू म्हणून भारतीय संघामध्ये
सामील झाले होते. या स्पर्धांमध्ये श्री कावस यांनी कांस्य पदक मिळवले आहे.
यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अनेक प्रतिष्ठित आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविली यामध्ये,
- कॉमनवेल्थ गेम्समध्ये - योगेश धाडवे (पुणे) आणि तिलक थापा (मुंबई) यांनी रौप्य पदक
- दक्षिण आशियाई स्पर्धा - योगेश धाडवे (पुणे) आणि रविभूषण कदम (अमरावती) सुवर्ण पदक
- जागतिक ज्युवेनाईल ज्युदो स्पर्धा, इजिप्त - अनिल उणेचा, पुणे - सुवर्ण पदक, नवीनचंद्र मोरे, अहमदनगर - रौप्य पदक
- राजीव गांधी ‘इंडिया कप’ - संतोष माने (प्रबोधिनी अमरावती), कुलबहादुर थापा (मुंबई)– कांस्य पदक
- दिनांक 6 ते 12 सप्टेंबर 2016 दरम्यान कोची (केरळ) येथे 10 व्या कॅडेट आणि 17 व्या ज्युनियर्स आशियाई स्पर्धांसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय ज्युदो संघामध्ये महाराष्ट्राच्या चार खेळाडूंची निवड झाली. यामध्ये स्नेहल खावरे (प्रबोधिनी पुणे), श्रवण शेडगे (साई केंद्र औरंगाबाद), शुभांगी राऊत (नागपूर), ऋचा धोपेश्वर (पुणे) यांचा भारतीय संघामध्ये समावेश होता. यापैकी कुमारी स्नेहलने रौप्य पदक पटकावले. भारतीय संघाच्या एकूण पदक प्राप्तीमधील कु. खावरेने मिळवलेले हे एकमेव रौप्य पदक आहे.
- वर्ष 2017 मध्ये भारतात प्रथमच दिल्ली येथे आयोजिलेल्या जागतिक शालेय ज्युदो स्पर्धेमध्ये कु. स्नेहल खावरे आणि ऋचा धोपेश्वर यांची निवड झाली होती. कुमारी स्नेहलने कांस्य पदक पटकावून राज्याला जागतिक शालेय स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले.