Latest News:

Shri. R. D. Khaniwale

Shri. R. D. Khaniwale (1909-1980)

Shri. R. D. Khaniwaleज्युदोचे उदगाते सेन्से डॉ. जिगोरो कानो आणि सेन्से प्रोफेसर मिफुने यांच्याकडून खाणीवाले सेन्से (ब्लॅक बेल्ट 7 दान) यांनी जपान मध्ये जाऊन ज्युदोचे धडे गिरवले. साधारणपणे 1930 चा तो काळ होता आणि लाठी-काठी आणि कुस्ती याचे ज्ञान असणार्‍या तसेच उत्तम तिरंदाज असणार्‍या श्री. खाणीवाले सेन्से यांना अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या संस्थेमधून जपान येथे तिरंदाजीचे प्रशिक्षण देण्यासाठी पाठवले होते. यासाठी त्यांना इचलकरंजी येथील महाराजांकडून शिष्यवृत्ती मिळाली होती. या आधी श्री ज्ञानेश्वर देशपांडे यांना जपानमध्ये तिरंदाजीचे प्रशिक्षण देण्यासाठी या शिष्यवृत्तीच्या आधारे पाठवण्यात आले होते पण ते कार्य काही कारणामुळे अपूर्ण राहिले. त्यानंतर श्री खाणीवाले सेन्से यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी होकार दिल्याने त्यांना जपान येथे पाठवण्यात आले. जपानमधील चार वर्षांच्या काळामध्ये श्री. खाणीवाले सेन्से यांनी तिरंदाजीचे तंत्र शिकवत असतानाच त्यांनी ज्युदोचे प्रशिक्षण प्राप्त केले. भारतामध्ये परतल्यानंतर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे तेथील पहिलवानांना शिकवण्यासाठी काही काळ ज्युदोचे वर्ग सुरू केले आणि नंतर ते इचलकरंजी येथून पुण्याला आले व पुण्यात स्थाईक होवून वर्ष 1940 च्या सुमारास त्यांनी ज्युदो प्रसारास प्रारंभ केला.

1935 च्या काळामद्धे श्री खाणीवाले सेन्से बर्लिन (जर्मनी) येथे आयोजिलेल्या ऑलिंपिक्समध्ये सहभागी झालेल्या भारतीय चमूचे व्यवस्थापक होते. त्यांच्या परिश्रमामुळे पुण्यातील ज्युदोचा प्रसार अत्यंत प्रभावशाली झाला व त्यांचे विद्यार्थी मोठ्या संख्येनी निर्माण झाले. या विद्यार्थ्यानी ज्युदो प्रसाराची कास धरून महाराष्ट्रामध्ये सर्वदूर प्रचारास सुरुवात केली. पुण्यानंतर नासिक, कोल्हापूर, अमरावती, सातारा अशा जिल्ह्यामध्ये ज्युदो चांगल्या पद्धतीने विस्तारत गेला तर त्यानंतर ठाणे, औरंगाबाद, नागपूर आदी जिल्ह्यामध्ये सेन्से श्री. खाणीवाले यांच्या हयातीमध्ये महाराष्ट्रात ज्युदो खेळला जावू लागला. सेन्से खाणीवाले यांच्या पहिल्या फळीतील विद्यार्थी सर्वश्री दीपक टिळक, सारंग साठे, बाळ देवकर, शरद जोशी, प्रदीप मोहिते, विजय लिमये, रामचंद्र जोशी, श्रीनिवास कुलकर्णी, सुभाष जोशी, रत्नाकर पटवर्धन, धनंजय भोंसले, पुरषोत्तम चौधरी, राजकुमार पुनकर, ज्ञानेश्वर आग्ने यासह अनेकांनी या खेळाच्या प्रसाराची धुरा वाहिली.